Home Liver care Hepatitis B – Know the facts

      Hepatitis B – Know the facts

      Cardiology Image 1 Verified By Apollo Hepatologist October 21, 2023

      8337
      Hepatitis B – Know the facts

      यकृत का महत्त्वाचे आहे?

      शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव असलेले यकृत जिवंत राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्याची अनेक महत्त्वाची कार्ये आहेत –

      ते पचनाला मदत करणारे पित्त, अर्थात रसायनांचे मिश्रण निर्माण करते.

      अन्नाचे पचन करून उर्जेत रूपांतर करण्यास मदत करते.

      रक्तातून धोकादायक पदार्थ काढून संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

      रक्ताची गुठळी होण्यास महत्त्वाची असलेली रसायने तयार करते.

      लोह, जीवनसत्वे आणि इतर आवश्यक घटक साठवून ठेवते

      हिपॅटायटीस बी काय आहे?

      यकृताचे विषाणूजन्य संक्रमण असलेला हिपॅटायटीस बी एचबीव्ही (हिपॅटायटीस बी विषाणू) मुळे होतो. त्यामुळे यकृताला सूज येते व त्याचा दाह होतो (तीव्र हिपॅटायटिस) आणि त्यामुळे यकृताचे कार्य नीट होत नाही. ते यकृतात टिकून राहू शकते आणि त्यामुळे जुनाट हिपॅटायटिस आणि कालांतराने यातून यकृताचा सिऱ्हॉसिस (व्रण पडणे) यकृताचा कर्करोग आणि यकृत बंद पडणे या गोष्टी घडू शकतात.

      हिपॅटायटीस बी कशामुळे होतो?

      रक्त किंवा शरीरातील इतर संसर्गजन्य द्रव पदार्थांच्या संपर्कामुळे हिपॅटायटीस बी विषाणू पसरतो. संसर्ग झालेले रक्त दिले गेले, दूषित सुई वापरली किंवा हिपॅटायटीस बी चा संसर्ग झालेल्या जोडीदारासह शारीरिक संबंध आल्यामुळे प्रौढांना हिपॅटायटीस बी होऊ शकतो. लहान मुलांना सहसा जन्माच्या वेळी त्यांच्या मातेकडून हिपॅटायटीस बी होऊ शकतो. हिपॅटायटीस बी विषाणू पाणी, हवा किंवा अन्नातून पसरत नाही.

      हिपॅटायटीस बी होण्याची जोखीम कोणाला असते?

      हिपॅटायटीस बी खूपच सामान्य आहे. आशियातील जवळपास २ ते ३ टक्के लोकांना जुनाट हिपॅटायटीस बी चे संक्रमण झालेले आहे. रुग्णालये व दवाखान्यांत सुया आणि सिरिंजेसचा पुनर्वापर, अस्वच्छ आणि दूषित सुयांनी टॅटू काढणे, अनियमीत आणि असुरक्षित पद्धतीने रक्त देणे यांसारख्या पूर्वीच्या पद्धतींमुळे हिपॅटायटीस बी ची जोखीम वाढली आहे. हिपॅटायटीस बी चा मोठा प्रादुर्भाव विचारात घेता, रक्ताची एक साधी चाचणी करून प्रत्येकाने हिपॅटायटीस बी संक्रमणाची चाचणी करावी अशी शिफारस केली जाते.

      हिपॅटायटीस बी संक्रमणाची लक्षणे आणि टप्पे काय आहेत?

      एचबीव्हीमुळे होणारे संक्रमण हे अल्पकालीन (तीव्र) आजार आणि दीर्घकालीन (जुनाट) आजार अशा दोन्ही प्रकारे होऊ शकते. तीव्र एचबीव्ही संक्रमण झालेल्या रुग्णांमध्ये भूक न लागणे, थकवा, मळमळणे आणि उलट्या होणे, पोटात दुखणे, कावीळ (त्वचा वा डोळे पिवळे दिसणे) आणि गडद रंगाची लघवी होणे यांचा समावेश होतो. तीव्र टप्पा सहसा २-८ आठवडे टिकून राहतो आणि बहुतांश रुग्ण पूर्णपणे बरे होतात.

      काही मोजक्या व्यक्तींमध्ये तीव्र संक्रमण होते आणि यकृत बंद पडण्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. काही प्रौढ आणि जन्माच्या वेळी संसर्ग झालेल्या जवळपास सर्वच लहान मुलांना नंतर जुनाट एचबीव्ही संक्रमण होते. या लोकांना अनेकदा अनेक वर्षे आजारी असल्यासारखे वाटत नाही. आजार वाढत गेल्यावर, सिऱ्हॉसिस आणि यकृत बंद पडण्यासारख्या गुंतागुंती निर्माण होतात आणि रुग्णांच्या पायांवर सूज येते (एडिमा), उदरपोकळीत द्रव जमा होते (असायटिस), रक्ताच्या उलट्या होतात आणि मानसिक गोंधळ उडतो.

      हिपॅटायटीस बी चे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात?

      हिपॅटायटीस बी मुळे २०-३० वर्षांच्या कालावधीत हळूहळू यकृत खराब होत जाते. उपचार न केलेल्या हिपॅटायटीस बी च्या जवळपास २० टक्के रुग्णांमध्ये यकृताच्या सिऱ्हॉसिस (यकृताला व्रण पडणे) विकसीत होतो. एकदा का सिऱ्हॉसिस विकसीत झाला की रुग्णांमध्ये यकृत बंद पडण्याची जोखीम असते.

      हिपॅटायटीस बी असलेल्या रुग्णांना यकृताचा कर्करोग होतो का?

      हिपॅटायटीस बी झालेल्या २० व्यक्तींपैकी एकाला यकृताचा कर्करोग होतो. रक्तातील विषाणूचे प्रमाण किती आहे यावर जोखीम अवलंबून असते आणि जुनाट हिपॅटायटीस बी आणि सिऱ्हॉसिस झालेल्या रुग्णांमध्ये ही जोखीम जास्त असते. जुनाट हिपॅटायटीस बी झालेल्या रुग्णांनी नियमीतपणे अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घ्यावेत, ज्यायोगे यकृताच्या लहान गाठी लवकरच्या स्थितीला ओळखता येऊ शकतात. लवकर निदान झाल्यास, त्यांच्यावर प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात.

      हिपॅटायटीस बी चे निदान कसे केले जाते?

      रक्ताची साधी चाचणी करून हिपॅटायटीस बी चे निदान करता येते. हिपॅटायटीस बी विषाणू डीएनए पीसीआर नावाची रक्ताची विशेष चाचणी करूनही रक्तातील हिपॅटायटीस बी विषाणूचे प्रमाण शोधता येते. उपचारांची गरज ठरविण्यासाठी आणि उपचारांच्या परिणामांवर देखरेख करण्यासाठी रक्तातील विषाणूचे प्रमाण माहीत असणे महत्त्वाचे आहे.

      तुम्हाला हिपॅटायटीस बी चे निदान झाल्यास तुम्ही काय करावे?

      उपचारांच्या गरजेबाबत तुमच्या डॉक्टरांशी बोला.

      रक्तातील विषाणूचे प्रमाण ठरविण्यासाठी रक्ताची चाचणी करून घ्या (हिपॅटायटीस बी विषाणू डीएनए पीसीआर).

      केवळ तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केलेलेच औषधोपचार घ्या.

      वनौषधींचा आश्रय घेऊ नका.

      मद्यपान पूर्णपणे बंद करा.

      तुमचा जोडीदार आणि मुलांसह सर्व कुटुंबियांना हिपॅटायटीस बी ची चाचणी करून घ्यायला सांगा.

      हिपॅटायटीस बी वर कसे उपचार केले जातात?

      जर तुम्हाला हिपॅटायटीस बी विषाणूचे संक्रमण झाले असेल तर, उपलब्ध असलेल्या उपचार पर्यायांबाबत तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे. तीव्र हिपॅटायटीस बी चे संक्रमण झालेले बहुतांश रुग्ण आपले

      आपण बरे होतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला आराम करण्यास, भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करण्यास, पौष्टिक आहार घेण्यास आणि मद्यपान टाळण्यास सांगतील. जुनाट हिपॅटायटीस बी चे संक्रमण झालेले रुग्ण आणि ज्यांना हिपॅटायटीस बी शी निगडीत सिऱ्हॉसिस झालेला असतो त्यांना त्यांच्या रक्तातील हिपॅटायटीस बी विषाणूसाठी विशिष्ट औषधे आवश्यक असतात. काही सामान्यपणे वापरली जाणारी औषधे आहेत एन्टेकाविर आणि टेनोफोविर. कधीकधी ६ ते १२ महिने इंटेर्फेरॉनची साप्ताहिक इंजेक्शन्स घ्यावी लागू शकतात.

      हिपॅटायटीस बी चा प्रसार रोखण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग काय आहे?

      हिपॅटायटीस बी संक्रमणास प्रतिबंध करण्याचा लशीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. सहा महिन्यांमध्ये ३ इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस दिली जाते. सर्व वयोगटातील लोकांना ते घेता येते. लशीकरण पूर्ण झाल्यानंतर, ते परिणामकारक ठरले किंवा नाही हे तपासण्यासाठी रक्ताची चाचणी करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या रक्ताच्या चाचणीमुळे रक्तातील संरक्षक प्रतिपिंडे शोधता येतात. भारतामध्ये, शासनाच्या सार्वत्रिक लशीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून मुलांना जन्माच्या वेळीच ही लस दिली जाते.

      निष्कर्ष

      एका दृष्टीक्षेपात वस्तुस्थिती –

      हिपॅटायटीस बी हा एचबीव्हीमुळे (हिपॅटायटीस बी विषाणू) होणारा यकृताचा आजार आहे.

      दूषित सुया, संसर्ग झालेले रक्त आणि हिपॅटायटीस बी चा संसर्ग झालेल्या जोडीदारासह शारीरिक संबंध यामुळे प्रौढांमध्ये हिपॅटायटीस बी पसरतो.

      लहान मुलांना सहसा जन्माच्या वेळी त्यांच्या मातेकडून हिपॅटायटीस बी होऊ शकतो.

      ५० भारतीयांमध्ये एकाला या विषाणूचे संक्रमण झालेले असते.

      हिपॅटायटीस बी झालेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

      रक्ताची साधी चाचणी करून हिपॅटायटीस बी चे निदान करता येते.

      या आजारावर उपचार करण्यासाठी परिणामकारक औषधोपचार आहेत.

      हिपॅटायटीस बी वर उपचार न केल्यास सिऱ्हॉसिस, यकृताचा कर्करोग होऊ शकतो तसेच यकृत बंद पडू शकते.

      एचबीव्हीला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लशीकरण.

      https://www.askapollo.com/physical-appointment/hepatologist

      To be your most trusted source of clinical information, our expert Hepatologists take time out from their busy schedule to medically review and verify the clinical accuracy of the content

      Cardiology Image 1

      Related Articles

      More Articles

      Most Popular Articles

      More Articles
      © Copyright 2024. Apollo Hospitals Group. All Rights Reserved.
      Book ProHealth Book Appointment
      Request A Call Back X