Verified By Apollo Cardiologist October 21, 2023
2665भारतातील तरुणांना आता असामान्य आव्हानाचा सामना करावा लागतो आहे – त्यांचे अनारोग्यपूर्ण ह्रदय हाताळण्याचा. भारतीयांमध्ये आता खूपच तरूण वयात हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत. दर मिनिटाला, ३०-५० वर्षे वयाच्या चार भारतीयांना जीवघेणा ह्रदयविकाराचा झटका येतो. खरे तर, जगभरातील इतर कोणत्याही वांशिक गटांपेक्षा भारतीयांना ८-१०वर्षे लवकर हृदयविकाराचे झटके येत आहेत. तेव्हा भारतातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे झटके का व कसे येत आहेत त्यावर एक नजर टाकूया.
तुमचे वय ३८ वर्षे आहे. तुम्ही बँकेत मध्यम वरिष्ठ पदावर कार्यरत आहात. तुमचे ३० व्या वर्षी लग्न झाले आणि तुम्हाला ५ वर्षांचे मूल आहे. तुमची पत्नी एका शाळेमध्ये समुपदेशक म्हणून काम करते. तुम्ही चांगले सुदृढ आहात आणि आठवड्यातून चार वेळा तासभर पळायला जाता. वजनाच्या प्रशिक्षणासाठी तुम्ही तुमच्या कार्यालयातील व्यायामशाळेत आठवड्यातून दोनदा जाता. क्वचित धूम्रपान करता आणि आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी मद्यपान करता, परंतु तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क आहात आणि कशाचाही अतिरेक होऊ देत नाही. तुम्ही वर्षभरापूर्वी नोकरी बदलली आणि दुसऱ्या बँकेत रूजू होण्याची आवश्यकता म्हणून आरोग्य तपासणी करून घेतली आणि सर्व काही व्यवस्थित होते.
तेव्हा एक दिवस, जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीच्या आवडत्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये मस्त रात्रीचे जेवण घेऊन झोपता आणि मध्यरात्री छातीत वेदना आणि अस्वस्थता वाटून तुम्हाला जाग येते तेव्हा तुम्हाला वाटते की जेवणामुळे पित्त झाले आहे. तुम्ही थोडेसे अँटासिड घेता, त्याचा तसा उपयोग होत नाही पण तुम्ही दुर्लक्ष करता आणि परत झोपता.
पण, तो ह्रदयविकाराचा झटका असू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? सिनेमांत दाखवतात तसा ह्रदयविकाराचा झटका नाट्यमयरित्याच येईल असे नाही. अगदी तुम्ही छाती दाबत अचानक वेदनेने कळवळायला लागालच असे नाही. अचानक जमिनीवर कोसळालच असे नाही. कदाचित ह्रदयविकाराच्या झटक्याच्या कोणत्याही स्पष्ट खुणा आणि लक्षणे दिसणारही नाहीत.
वाढते वय हा एक जोखीम घटक आहे आणि सामान्यपणे, पुरुषांमध्ये ४५ वयानंतर आणि स्त्रियांमध्ये ५५ वर्षांनंतर ह्रदयविकाराचा झटका येणे सामान्य असले तरी, ३० ते ४० वर्षे वयाच्या तरूणांमध्येही आता ह्रदयविकाराचा झटका दुर्मिळ राहिलेला नाही. हृदयाच्या रोहिणीचा आजार (CAD) तरूण भारतीयांमध्येही उद्भवतो आहे. ५० वर्षांहून कमी वय असलेल्या ५०% हून जास्त लोकांमध्ये CAD मुळे मृत्यू होतो आहे. तरूणांमध्ये तीव्र MI (ह्रदयविकाराचा झटका) चा प्रादुर्भाव २५ ते ४०% इतका जास्त होत आहे, म्हणजे वयाच्या ४० वर्षांपूर्वीच. इतर वांशिक गटांच्या तुलनेत भारतीयांमध्ये एक दशक आधीच ह्रदयविकाराचा झटका येत आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, भारतीयांमधील ५०% हृदयविकाराचे झटके हे वयाच्या पन्नाशीपूर्वी आणि २५% हृदयविकाराचे झटके हे वयाच्या चाळीशीपूर्वीच येतात.
कशामुळे तरूण वयात भारतीयांना हृदयविकाराच्या झटक्यांचा धोका निर्माण होत आहे? अभ्यासांतून डिस्लिपिडेमियाची (रक्तातील चरबीचे असामान्य प्रमाण) असामान्य रचना पुढे आली आहे जिला अंगभूत इन्शुलिन अवरोधाची जोड मिळून कमी वयात मधुमेह होतो. इतर जोखीम घटकांमध्ये धूम्रपान आणि इतर स्वरूपांत तंबाखूचा वापर व हायपरटेन्शनचा समावेश होतो. अनुवंशीक कारणेही आपली भूमिका बजावत असतात. भारतीयांमध्ये अनुवंशीक हायपरकोलेस्ट्रेरोलेमिया हे अकाली ह्रदय विकार होण्याचे एक सामान्य कारण आहे.
तरूण वयात ह्रदयविकाराचा झटका येण्याची जोखीम निर्माण होण्यात आजच्या आधुनिक जीवनशैलीचा मोठा वाटा आहे. नोकरीतील स्पर्धा आणि मागण्यांमुळे मानसिक व शारीरिक ताण वाढत आहे. त्यामुळे धूम्रपान व मद्यपानासारख्या सवयी लागत आहेत ज्या ह्रदय रोगासाठी जोखीम घटक आहेत. व्यायामाचा अभाव आणि कमी झोप यामुळे समस्या वाढत आहेत.
त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आल्याच्या खुणा माहीत असणे महत्त्वाचे आहे. छातीत अस्वस्थता वाटते, किंचीत वेदना किंवा आवळल्याची भावना किंवा छातीवर हत्तीने पाय दिला असल्यासारखे वाटणे; मळमळणे, अपचन, छातीतील जळजळ, पोटात दुखणे; हाताकडे सरकणारी वेदना, गरगरणे किंवा डोके हलके झाल्यासारखे वाटणे; घसा किंवा जबड्यात वेदना; थकव्याची भावना; जीव गुदमरल्यासारखे किंवा श्वास अडकल्यासारखे खूप जास्त जोरात घोरणे; विनाकारण घाम येणे; खूप वेळ खोकला येत राहणे, विशेषतः पांढरा किंवा गुलाबी कफ पडणे; पाय, घोटे व पावलांवर सूज; आणि ह्रदयाचे ठोके अनियमीत पडणे.
तेव्हा जर वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर, ते दुसरे काहीतरी असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये, तर तो ह्रदय रोग नाही याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. एखादी व्यक्ती ह्रदय रोग होण्यासाठी किंवा ह्रदयविकाराचा झटका येण्यासाठी खूपच लहान आहे असे समजून चेतावणीच्या खुणांकडे दुर्लक्ष करू नये. अथेरोस्क्लेरोसिस (रक्तवाहिन्यांमध्ये मेद जमा होणे) लवकर सुरू होतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे तरूण वयातच प्रतिबंधालाही सुरुवात करावी. जोखीम घटकांच्या व्यवस्थापनासाठी लवकर निदान आणि उपचार ही गुरुकिल्ली आहे. प्रथम बैठी जीवनशैली बदलून निदान मध्यम सक्रिय जीवनशैलीचा अंगिकार करावा ज्यामध्ये पुरेसा व्यायाम आणि पौष्टिक आहाराचा समावेश असेल तसेच धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहावे. योग्य पोषण आणि आहार महत्त्वाचे आहे. तेल व कर्बोदकांचे सेवन कमी करावे आणि संपृक्त स्निग्धांश कमी असलेला जास्त प्रथिने, भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला आहार घ्यावा.
आपल्या दिनक्रमात, कार्डिओ (ह्रदयासाठी व्यायाम), तसेच तणावासाठी योगासने व ध्यानधारणेचा समावेश करून शारीरिक हालचाली वाढवाव्या. केवळ वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यावरच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य नाही. नियमीत आरोग्य तपासणी करून कोणत्याही समस्यांचे निदान लवकर करणे महत्त्वाचे आहे, विशेषतः वयाच्या चाळीशीनंतर. तुमच्या स्थानिक आरोग्यसेवा प्रदाताकडून नियमीतपणे ह्रदयाचे स्क्रीनिंग करून घ्या. बहुतांश आरोग्यसेवा प्रदाता सर्वसमावेशक निरोगी ह्रदय तपासणी किंवा निरोगी ह्रदय पॅकेजेस देऊ करतात.
शेवटी, वयाच्या ३५ ते ४० वर्षांनंतर आयुष्याचा सर्वोत्तम भाग जगायचा बाकी असतो!
The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content
December 3, 2023