Verified By October 21, 2023
3446मोठ्या प्रमाणात लोकांना वाटते की मजेत वेळ घालविण्यासाठी मद्यपान आवश्यक असते. अनेकांना तर असेही वाटते की जीवनाचा आनंद लुटण्याची ही गुरुकिल्ली आहे. एवढेच नाही तर, काहींना तर असेही वाटते की मद्यपान त्यांच्या ह्रदयासाठी चांगले असते. मद्यपान आणि ह्रदयाचे आरोग्य यांतील संबंध जाणून घेण्यासाठी काही कठोर वस्तुस्थिती वाचा.
बहुतांश लोक औषध म्हणून मद्य घेत नाहीत. दुर्दैवाने, ते एक औषध आहे! मद्यपानाच्या व्यसनामुळे अनेक आयुष्ये धुळीला मिळाली आहेत, अनेक कुंटुंबांची वाताहत झाली आहे आणि इतर कोणत्याही मादक पदार्थांपेक्षा मद्यामुळे जास्त आजार होत आहेत. एवढेच नाही तर, दीर्घकाळ खूप जास्त मद्यपान करत राहिल्यामुळे ह्रदयाला खूप जास्त धोका निर्माण होतो. अधिक जाणून घेण्यासाठी, प्रथम आपल्या ह्रदयाचे कार्य समजावून घेऊ या.
आपले ह्रदय हा एक पंप आहे जो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्त फिरवत ठेवतो. ते शरीरातील कचरा आणि नको असलेला कार्बन डाय ऑक्साईड वाहून नेते आणि शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन आणि पोषक घटकांचे वितरण करतो. जेव्हा आपले ह्रदय, रक्तवाहिन्या आणि त्यांभोवतीच्या रोहिण्यांना नुकसान पोहोचते तेव्हा ही पंपाची प्रणाली नीट कार्य करत नाही. अशा सर्व स्थितींना (ह्रदय किंवा रक्तवाहिन्यांना प्रभावित करणारे सर्व प्रकारचे आजार) आपले डॉक्टर एकत्रितपणे कार्डिओव्हसक्युलर आजार किंवा ह्रदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असे म्हणतात. ह्रदयाच्या रोहिण्यांसंबंधी विकार (बंद झालेल्या रोहिण्या) हा ह्रदय विकाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे ज्यामुळे ह्रदय विकाराचा झटका येऊ शकतो.
आपल्या ह्रदयाचा पंप चालू राहण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ह्रदयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रोहिणीच्या आतील भिंतींवर हळूहळू मेद जमा होऊन ती अरुंद होते किंवा बंद होते तेव्हा ह्रदयविकाराचा झटका येतो. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास, ह्रदयाचा पंप नीट कार्य करू शकत नाही आणि काही प्रकरणांमध्ये त्याची धडधड पूर्ण थांबते आणि ह्रदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होतो.
ह्रदयाचे आरोग्य आणि मद्य यांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत. अनेक ऑनलाईन लेखांमध्ये सुचवले जाते की मध्यम प्रमाणात मद्य सेवनामुळे ह्रदय रोगापासून संरक्षण मिळते. परंतु, खरी ग्यानबाची मेख इथेच आहे! डॉक्टरांना खात्री नाही की आरोग्याला होणारे लाभ हे मद्यामुळे आहेत का मध्यम मद्यपान करणारे लोक चांगल्या जीवनशैलीचे जे पर्याय निवडतात त्यामुळे आहेत. परंतु, त्यांना खात्री आहे की खूप जास्त मद्यपान करण्याचे आपल्या ह्रदयावर विषारी परिणाम होतात.
खूप जास्त मद्यपानामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अनेक अभ्यासांतून सुचवले गेले आहे की धूम्रपान किंवा जास्त वजन यांसारख्या इतर जोखीम घटकांव्यतिरिक्त, खूप जास्त मद्य सेवनामुळे हृदयविकाराचे झटके येण्याची जोखीम वाढते. मग अशा लोकांना ह्रदयरोगाचा कौटुंबिक इतिहास नसला तरीही हे घडू शकते.
खूप जास्त मद्यपानामुळे (दिवसाला तीनहून जास्त सर्व्हिंग्ज घेतल्यामुळे) तुमच्या ह्रदयाला इजा होऊ शकते आणि ह्रदयाच्या स्नायूंचा आजार होऊ शकतो, याला कार्डिओमायोपॅथी (विस्तारलेले ह्रदय) असे म्हणतात. याशिवाय, नियमीत किंवा खूप जास्त मद्य घेतल्यामुळे रक्तातील मेदाच्या पातळ्या वाढून रोहिण्या अवरोधित होतात आणि ह्रदयविकाराचा झटका येतो. हे खरे आहे, कारण खूप जास्त मद्यपानाची सवय असलेले लोक ह्रदयरोगाच्या अनेक जोखमींना उघड होतात, यामध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि रक्तात निर्माण होणाऱ्या मेदाचा स्तर वाढणे (ट्रायग्लिसेराईड) यांचा समावेश होतो.
बिंग ड्रिंकिंग: बिंग ड्रिंकिंग म्हणजे थोड्या काळात खूप जास्त मद्यपान करणे. भारतातील बहुतांश तरूणांना वाटते की बिंग ड्रिंकिंग ट्रेंडी आहे. झटपट, खूप जास्त मद्यपान केल्यामुळे (पुरुषांनी एकावेळी ५ किंवा जास्त ड्रिंक्स घेणे आणि स्त्रियांनी ४ किंवा जास्त ड्रिंक्स घेणे) हे मद्यपी वेगाने झिंगतात. एकदम खूप जास्त मद्यपान केल्यामुळे रक्तदाब वेगाने वाढतो आणि यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्यास चालना मिळू शकते. एक अभ्यास सांगतो की बिंग ड्रिंकिंग (एका संध्याकाळी सहा किंवा जास्त कॉकटेल्स), त्यानंतरचे सात दिवस ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक (मस्तिष्काघात) येण्याची जोखीम वाढवते.
खूप जास्त मद्यपान: खूप जास्त मद्यपान हे बिंग ड्रिंकिंगपेक्षाही वाईट असते. खूप जास्त मद्यपानाचे नकारात्मक परिणाम त्वरित होतात आणि दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे सेवनानंतर काही तासांमध्ये ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक (मस्तिष्काघात) येण्याची जोखीम खूप जास्त वाढते. दर आठवड्याला पुरुषांनी १५ किंवा त्याहून जास्त आणि स्त्रियांनी आठ किंवा त्याहून जास्त ड्रिंक्स घेणे याला खूप जास्त मद्यपान मानले जाते. खूप जास्त मद्यपानामुळे ठराविक संप्रेरके मुक्त होतात ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात किंवा कडक होतात आणि रक्तदाब वाढतो. याचा ह्रदयावर विपरीत परिणाम होतो. हृदय व रक्तवाहिन्यांच्या अनेक समस्यांशी खूप जास्त मद्यपानाचा दीर्घकाळापासून संबंध जोडला गेला आहे, जसे की अँजायना (छातीत दुखणे) आणि ह्रदय बंद पडणे. खूप जास्त मद्यपान केल्यामुळे ह्रदयाचे ठोके अनियमित पडतात.
काही अभ्यासात म्हणले आहे की प्रासंगिक, मध्यम प्रमाणात मद्य सेवन चांगले असू शकते किंवा ह्रदयरोगाची जोखीम कमी करू शकते, तरीही मद्यपान टाळणे उत्तमच. ह्रदय विकाराची जोखीम कमी करण्यासाठी मद्यपान सुरू करणे ही काही फारशी चांगली कल्पना नाही.
सरळ सांगायचे तर ते तितके महत्त्वाचे नाही! अजिबात मद्यपान न करणे कधीही चांगले. आपल्या ह्रदयाला मद्यपानामुळे जे संभाव्य किरकोळ फायदे मिळू शकतात त्यापेक्षा त्यातून उद्भवणाऱ्या कर्करोग आणि यकृताच्या आजारांसारखे धोकेच जास्त आहेत. ह्रदय विकाराची जोखीम टाळण्याचे इतर निरोगी व सुरक्षित मार्ग आहेत, जसे की नियमीत व्यायाम, पौष्टिक आहार इत्यादी.
आणि…जर तुम्ही मध्यम प्रमाणात मद्यपान करत असाल तर, वेळोवेळी निरोगी ह्रदय तपासणी जरूर करून घ्या. तुमच्या जवळपासचा कोणी स्थानिक आरोग्यसेवा प्रदाता सर्वसमावेशक निरोगी ह्रदय पॅकेज देऊ करत आहे का ते शोधा आणि आजच करून घ्या.
*कॅनडाच्या हिलिस सेखसरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अँड युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू द्वारा, मुंबईत केलेला अभ्यास