Verified By Apollo Neurologist September 23, 2023
4293“अपस्मार” हा शब्द कानावर पडताच, आपल्या मनात पहिला विचार येतो तो “झटक्यांचा”. अपस्माराची व्याख्या करणाऱ्या लक्षणांबाबत तुम्हाला किती माहीत आहे?
अपस्मार—ज्याला झटक्यांचा विकार असेही म्हणतात, ही भारतातील एक गंभीर समस्या आहे. एखादा झटका आल्यावर शहरी भागांतील बहुसंख्य लोक (सुमारे ६० टक्के) डॉक्टरांचा सल्ला घेतात, तर ग्रामीण भारतातील काही मोजकेच लोक (सुमारे १० टक्के) डॉक्टरांकडे जातात.
बहुतेकदा, डॉक्टरांना अपस्माराचे कारण ठरवता येत नाही. जेव्हा आपण कारण ओळखतो तेव्हा, ते सहसा चयापचयातील असामान्यता किंवा बालकांमध्ये जन्मजात मेंदूची विकृती, मेंदूतील गाठ किंवा प्रौढांमध्ये धक्का बसणे किंवा वृद्धांमध्ये मस्तिष्कघात किंवा चेतापेशींचा ऱ्हास होणारा आजार यांपैकी काहीतरी निघते.
अपस्मार हा एक जुनाट आजार आहे ज्यामध्ये, मेंदूच्या पेशींमध्ये असामान्य विद्युत हालचाली झाल्यामुळे वारंवार न डिवचता येणाऱ्या झटक्यांचा समावेश होतो. अपस्मारासह जगताना सर्वात अवघड भाग म्हणजे झटक्यांची अनिश्चितता, विशेषतः जर उपचारांमुळे झटके नियंत्रित करता आले नाहीत तर. परंतु केवळ हीच एक आव्हानात्मक स्थिती नसते.
अपस्मार हा एक मानसिक आजार असल्याचा गैरसमज असल्यामुळे अपस्मार असलेल्या लोकांकडे इतर लोक कलंकीत जीवन म्हणून पाहू शकतात. तसेच, अपस्माराबरोबरच काही चेतासंस्थेच्या आणि मानसिक स्थितीही असू शकतात. या विकृतीचे मूळ अन्यत्र असू शकते किंवा अपस्माराच्याच प्रगटीकरणामुळेही हे घडू शकते. यामध्ये नैराश्य, अस्वस्थता, संवेदनभ्रम आणि स्मरणशक्ती जाण्याचा समावेश होतो.
मेंदूच्या चेता पेशींचे कार्य विद्युत हालचालींवर आधारित असते. सामान्य मेंदूमध्ये, लाखो चेता पेशींच्या स्वतःच्या, स्वतंत्र विद्युत हालचाली चालू असतात. झटका येतो तेव्हा, मेंदूतील मोठ्या प्रमाणात चेता पेशी एकाचवेळी पेटतात आणि परिणामी विद्युत वादळ निर्माण होते. झटक्यांचे प्रगटीकरण या वादळामध्ये समाविष्ट असलेल्या मेंदूच्या भागांवर अवलंबून असते.
बहुतांश अपस्माराच्या रुग्णांना (सुमारे ८० टक्के) साधे आंशिक झटके किंवा गुंतागुंतीचे आंशिक झटके येतात.
साध्या आंशिक झटक्याच्या लक्षणांमध्ये असामान्य, अनैच्छिक स्नायूंच्या हालचालींचा समावेश होतो; दृष्टीमध्ये अडथळा किंवा आभासी गंध आणि चवीसारखे संवेदनात्मक बदल होतात; पोटात संवेदना होतात; गरगरते; घाम येतो; आणि अचानक, स्पष्ट न करता येण्यासारख्या भावना निर्माण होतात, जसे की देजा वू.
गुंतागुंतीच्या आंशिक झटक्यात, एखादी व्यक्ती दिवास्वप्न पाहात असल्यासारखी भासते किंवा अन्यथा ती काय करत आहे याची तिला जाणीवही नसते. ती व्यक्ती आपसूकपणे किंवा यादृच्छिक कृती करू शकते, जसे की शर्टाची कॉलर खेचत राहणे. जेव्हा झटका संपतो तेव्हा कदाचित काय घडले ते त्याला किंवा तिला आठवणारही नाही. या झटक्यांपैकी कशामध्येही दुय्यमपणे सर्वसाधारण झटक्याचा समावेश असू शकतो, ज्याला पूर्वी “ग्रँड माल (महा अपस्माराचे झटके)” म्हणत.
प्राथमिक सर्वसाधारण अपस्मार: हे रुग्ण अनुभवत असलेल्या झटक्यांमध्ये मेंदूच्या सर्व चेता पेशी एकाचवेळी कार्य करतात. सर्वसाधारण झटके अनेक स्वरूपांत असू शकतात. उदाहरणार्थ, टोनिक-क्लोनिक झटक्यांत, व्यक्तीचे भान हरपते आणि त्याचे स्नायू ताठर होऊन शरीराला झटके बसू शकतात. सर्वसाधारण झटक्यांच्या इतर प्रकारांमध्ये प्रतिसाद न देता टक लावून पाहात राहणे, टोनिक-क्लोनिक झटक्यांहून कमी तीव्र प्रमाणात शरीराला संक्षिप्त झटके बसणे किंवा स्नायूंचा पिळदारपणा कमी होऊन व्यक्ती खाली कोसळणे अशा घटना घडू शकतात. सर्वसाधारण लोकांपेक्षा अपस्मार असलेल्या व्यक्ती चालना देणाऱ्या काही ठराविक घटकांना जास्त असुरक्षित असतात, जसे की झोप कमी होणे, रक्तातील साखर कमी होणे आणि संप्रेरकांतील बदल.
कधीकधी, झटक्यांपूर्वी व्यक्तीला पूर्वसूचना मिळते, याला ऑरा म्हणतात. तोंडात वेगळीच चव जाणवणे किंवा विचित्र वास येणे, गरगरणे, मळमळणे, दृष्टी बदलणे किंवा डोकेदुखी यांसारख्या ओळखता न येणाऱ्या विचित्र संवेदनेचे रुग्ण वर्णन करतो. ऑरा हे साध्या आंशिक झटक्यांसारखे असतात आणि यासाठी उपचार आवश्यक आहेत.
झटक्याचा विचार करता तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते? एखाद्याला आकडी आल्याचे दृश्य तुमच्या डोळ्यांसमोर येते का? झटक्यांसह आकडी येते, परंतु तुम्हाला वाटते तितकी वरचेवर येत नाही.
वस्तुस्थिती ही आहे की केवळ २० – ३० टक्के झटक्यांमध्ये आकडी येते. गोंधळ आणि मानसिक स्थितीमध्ये बदल ही सर्वात सामान्य प्रगटीकरणे आहेत. झटक्यामध्ये जर काही महत्त्वाचे असते तर ते म्हणजे स्थान. उदाहरणार्थ, जर दृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागामध्ये एखाद्या पेशीसमूहाने चुकीचे प्रज्वलन केले तर, व्यक्तीला प्रकाशाचा झगमगाट दिसू शकतो. जर मेंदूच्या कारक-नियंत्रित करणाऱ्या भागात झटका आला तर, अनैच्छिक हालचाली होऊ शकतात.
बहुतांश झटके एक मिनिटाहून कमी काळ टिकतात. नंतर, व्यक्तीला थकवा येऊ शकतो, मळमळल्यासारखे वाटते, अशक्तपणा येतो, गोंधळ उडतो किंवा गरगरते आणि पुन्हा पूर्ववत होण्यास त्याला काही मिनिटे किंवा काही तास वेळ लागू शकतो, क्वचित याला अनेक दिवसही लागू शकतात.
सहा महिने ते एक वर्षापर्यंत पुनरावर्ती झटक्यांचा अनुभव आलेल्या व्यक्तींनी अपस्मारावर उपचार करण्यात तज्ज्ञ असलेल्या न्युरॉलॉजिस्टकडून (चेतासंस्थेच्या विकारांवर उपचार करणारे तज्ज्ञ) मूल्यांकन करवून घ्यावे. शारीरिक तपासणी, चुंबकीय अनुनाद प्रतिमा आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी ही अपस्माराची संभाव्य कारणे शोधण्याची
महत्त्वाची साधने आहेत. तथापि, मेंदूच्या विद्युत हालचाली मोजण्यासाठी केली जाणारी चाचणी, विद्युतमस्तिष्कालेख (इलेक्ट्रोएन्केफॅलोग्राम – EEG), हा अपस्माराच्या निदानाचा पाया आहे. या हालचालींमध्ये तीक्ष्ण टोके आल्यास ती झटके दर्शवतात आणि याचा अर्थ अपस्मार आहे.
अपस्मारासाठी कोणताही एकच उपाय नाही, परंतु काही मुले मोठी झाल्यावर त्यांचातील ही विकृती नष्ट होते. झटके आणि कोसळणे काढून टाकणे आणि त्यांची वारंवारिता कमी करणे हे उपचारांचे ध्येय आहे. औषधोपचार हा उपचारांचा पहिला टप्पा आहे. तज्ज्ञ डॉक्टर संपूर्ण निदान केल्यावर अपस्मारासाठी मान्यताप्राप्त औषधोपचार विहित करतील.
जर दोन औषधे घेऊनही रुग्णाचे झटके नीट नियंत्रित झाले नाहीत तर, आणखी औषधे घातल्यामुळे कदाचित स्थिती फारशी सुधारत नाही. अशा रुग्णांमध्ये पुढची पायरी अपस्माराच्या शस्त्रक्रियेची असू शकते. प्रत्येक रुग्णासाठी सर्वात प्रभावी उपचार ठरवण्यासाठी न्युरॉलॉजिस्ट, न्युरोसर्जन (चेतासंस्थेच्या विकारांचे शल्यचिकित्सक) आणि प्रगत उपचार पद्धती उपलब्ध असलेले इतर प्रदाता असा उपचारकर्तांचा एक गट आवश्यक असतो. उत्तम निकाल मिळवण्यासाठी या गटाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.
अपस्मार ही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे जिला पूर्वी मानसिक आरोग्याची विकृती मानली जात असे. रोगपरिस्थितिविज्ञान (एपिडिमिऑलोजीकल) अभ्यास आणि निदानातील प्रगतीमुळे, हल्ली अपस्माराला चेतासंस्थेचा विकार मानले जाते. अपस्माराच्या अनेक रुग्णांना रोगपरिस्थितिविज्ञानाच्या वैद्यकीय उपचारांतून आणि कौटुंबिक तसेच सामाजिक सहयोगातून फायदा झाला आहे. अपस्माराच्या रुग्णांना सहाय्यक व सुरक्षित वातावरण प्रदान करणे ही काळाची गरज आहे. अपस्मार झालेल्या लोकांना जगण्यास मदत मिळावी यासाठी हितकारी पर्यावरण प्रदान करण्यामध्ये कुटुंब आणि समाज मुख्य भूमिका बजावू शकतात.