• Emergency
    • Apollo Lifeline

    Emergency

      Home Vernacular Blogs Marathi Difference between Stroke And Heart Attack

      Difference between Stroke And Heart Attack

      Cardiology Image 1 Verified By Apollo Cardiologist October 21, 2023

      2805
      Difference between Stroke  And Heart Attack

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) – हे भिन्न आहेत का?

      जगभरात ह्रदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार हे अकाली मृत्यूचे कारण आहे आणि याच्या दोन सर्वात सामान्य स्थितींचा – ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात), आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे आपण समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) हे दोन्हीही ह्रदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे जीवघेणे आजार आहेत ज्यांच्यासाठी तत्काळ वैद्यकीय मदत आवश्यक असते. दोन्हींमध्ये सारख्याच जोखमी आणि परिणाम असले तरी, ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) या दोन भिन्न वैद्यकीय स्थिती आहेत. त्यांची लक्षणेही भिन्न असू शकतात. दोन्हींमध्ये जरी रक्तवाहिन्यांचा (प्रामुख्याने रोहिण्यांचा) समावेश असला तरी, त्यांचा आपल्या शरीराच्या भिन्न अवयवांवर परिणाम होतो.

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकला (मस्तिष्काघात) जोडणारे जोखीम घटक

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) जरी भिन्न असले तरी, त्यांचे जोखीम घटक सारखेच असतात, जसे की धूम्रपान, मधुमेह, बैठी जीवनशैली, कोलेस्टेरॉल जास्त असणे, रक्तदाब जास्त असणे, अनुवंशिकता किंवा कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, खूप जास्त मद्यपान, हे त्यांपैकी काही आहेत.

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) – फरक

      साध्या शब्दांत सांगायचे तर, ह्रदयविकाराच्या झटक्यामध्ये मुख्य रोहिण्यांच्या आतील भिंती किटण/प्लाकमुळे बंद होतात. त्यामुळे ह्रदयाला होणारा रक्ताचा प्रवाह निर्बंधित होतो आणि ह्रदयाच्या स्नायूला नुकसान पोहोचते. दुसरीकडे, स्ट्रोक (मस्तिष्काघात), हा ह्रदयाशी संबंधित नसतो; यामध्ये मेंदूत रक्ताची गुठळी (इस्केमिक) होते किंवा रक्तवाहिनी फुटते (हॅमरेज).

      परंतु, ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) काहीही झाले तरी पिडीत व्यक्तीचे प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. जितक्या लवकर तुम्ही स्ट्रोक (मस्तिष्काघात) किंवा ह्रदयविकाराचा झटका ओळखाल, तितक्या जिवंत राहण्याच्या आणि पूर्णपणे बरे होण्याच्या शक्यता जास्त असतात. परंतु,त्वरित उपचार मिळतील याची खात्री करण्यासाठी, ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) दोन्हींची लक्षणे व खुणा समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

      ह्रदयविकाराचा झटका

      मानवी शरीरातील ह्रदय हा सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा अवयव आहे. तथापि, आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे या अवयवावर आपत्तीजनक परिणाम होत आहेत. जेव्हा हृदयाच्या रोहिणीला होणारा रक्ताचा प्रवाह कमी होतो किंवा त्यामध्ये अडथळा येतो तेव्हा ह्रदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे ह्रदयाकडे जाणारा रक्ताचा प्रवाह थांबतो. तुमच्या ह्रदयाच्या स्नायूला रक्ताचा प्रवाह पोहोचविणाऱ्या रोहिण्यांच्या भिंतींवर किटण/प्लाक (मेद घटक आणि कोलेस्टेरॉल) जमा झाल्यामुळे हे घडते.

      किटण/प्लाक एका रात्रीत जमा होत नाही. ते सहसा अनेक वर्षे हळूहळू जमा होत असते. जर किटण/प्लाकचा तुकडा ह्रदयाच्या रोहिणीच्या भिंतीपासून वेगळा झाला तर, त्याभोवती रक्ताची गुठळी तयार होते आणि त्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या स्नायूपर्यंत जाणाऱ्या सामान्य रक्ताचा प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा तो

      पूर्ण थांबू शकतो. परिणामी, ह्रदयाच्या स्नायूच्या काही भागाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे ह्रदयाचा हा भाग खराब होऊ लागतो आणि जर या अडथळ्यावर त्वरित उपचार केले नाहीत तर तो भाग मृत होऊ शकतो.

      जेव्हा (ह्रदयाला ऑक्सिजन व पोषक घटकांचा पुरवठा करणाऱ्या) योग्य रक्तप्रवाहाच्या अभावी ह्रदयाच्या स्नायूचा एखादा भाग खराब होतो किंवा मृत होऊ लागतो तेव्हा त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येतो.

      स्ट्रोक

      जेव्हा मेंदूकडे ऑक्सिजन आणि इतर आवश्यक पोषक घटक वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी होऊन ती बंद होते किंवा फुटते तेव्हा स्ट्रोक अर्थात ‘मस्तिष्काघात’ होतो. परिणामी, मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन न मिळण्यामुळे त्या मृत होऊ लागतात. यामुळे स्ट्रोक (मस्तिष्काघात) होऊ शकतो.

      स्ट्रोक (मस्तिष्काघात) झाल्यावर पहिल्या काही तासांमध्ये उपचार केल्यास ते सर्वात प्रभावी ठरतात. त्यामुळे लक्षणे ओळखणे आणि वेगाने कृती करणे महत्त्वाचे असते.

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची (मस्तिष्काघात) लक्षणे ओळखणे

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची (मस्तिष्काघात) लक्षणे जरी सारखी असली तरी त्यांमध्ये काही ठळक फरक आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये, वैद्यकीय उपचार तातडीने मिळणे आवश्यक असते.

      ह्रदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

      सर्वच ह्रदयविकाराचे झटके सारखे नसतात. त्यांमध्ये छातीत वेदना होतीलच असे नाही. छातीत अस्वस्थ वाटू शकते किंवा दबाव आल्यासारखे वाटू शकते. ह्रदयविकाराच्या झटक्याची काही सामान्य लक्षणे म्हणजे

      • छाती, बाहू, खांदा, कोपर आणि जबड्यात अस्वस्थता/वेदना
      • घाम येणे
      • धाप लागणे
      • गरगरणे आणि मळमळणे

      प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणे बदलू शकतात. काहींना सौम्य लक्षणे असतील किंवा अजिबात लक्षणेच नसतील आणि त्यांना ‘मूक ह्रदयविकाराचा झटका’ येऊ शकतो.

      स्ट्रोकची (मस्तिष्काघात) लक्षणे

      मेंदूला कोठे व कोणत्या भागात नुकसान पोहोचले आहे त्यानुसार स्ट्रोकची (मस्तिष्काघात) असतात. मेंदूला नुकसान पोहोचल्यामुळे अनेक कार्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, जसे की वाचा, स्नायूंचे नियंत्रण आणि स्मरणशक्ती. स्ट्रोकच्या (मस्तिष्काघात) काही सामान्य लक्षणांत समावेश होतो:

      • चेहरा ओघळल्यासारखा होणे
      • अचानक पाय, हात, चेहरा… किंवा सहसा शरीराची एक बाजू लुळी पडणे किंवा बधीर होणे
      • अनपेक्षित अचानक डोकेदुखी सुरू होणे व त्यासह उलट्या होणे, गरगरणे किंवा भान हरपणे
      • गोंधळ उडणे किंवा बोलताना अडचण येणे किंवा बोलणे अस्पष्ट होणे
      • गरगरणे, अचानक तोल जाणे किंवा चालताना अडचण येणे
      • आंशिक दृष्टी गमावणे किंवा दोन्ही अथवा एका डोळ्याने न दिसणे

      उपचार

      ह्रदयविकाराच्या झटक्यावर उपचार करणे

      ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला रुग्णालयात आणल्यावर गुठळी फोडणारी औषधे दिली जातात. काही प्रकरणांमध्ये, अँजिओप्लास्टी (हृदयाच्या रोहिणीतील अडथळा शस्त्रक्रियेने काढणे किंवा दुरस्त करणे) करावी लागू शकते किंवा स्टेंट बसवावा लागू शकतो. निवडक गंभीर रुग्णांना आपात्कालीन कोरोनरी आर्टरी बायपास (ह्रदयाच्या आंशिक किंवा पूर्णपणे अवरोधित झालेल्या रोहणीच्या काही भागाला दुसरी दिशा देऊन रक्ताचा प्रवाह सुधारणे) करावी लागू शकते.

      स्ट्रोकवर (मस्तिष्काघात) उपचार करणे

      स्ट्रोकवर (मस्तिष्काघात) उपचार करण्याची पहिली पायरी म्हणजे सीटी स्कॅन. जर स्कॅनमध्ये दिसले की स्ट्रोक (मस्तिष्काघात) इस्केमिक आहे (मेंदूच्या रक्तवाहिनीला अवरोधित करणाऱ्या किंवा बंद करणाऱ्या रक्ताच्या गुठळीमुळे झालेला) आणि लक्षणे उद्भवल्यापासून ४-५ तासांमध्ये रुग्णाला रुग्णालयात आणले असेल तर थ्रम्बोलायसिस (कृत्रिमरित्या रक्ताची गुठळी विरघळवणे) दिले जाऊ शकते.

      निष्कर्ष

      ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (मस्तिष्काघात) दोन्हींचे परिणाम शरीरासाठी जीवघेणे असू शकतात, परंतु स्ट्रोकमधून (मस्तिष्काघात) वाचलेल्या लोकांमध्ये गंभीर अपंगत्व येण्याची जास्त शक्यता असते. तथापि, आपण काही जीवनशैलीतील बदल करू शकतो आणि संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी किंवा सुदृढ ह्रदय पॅकेजद्वारे नियमीतपणे आरोग्य तपासणी करून घेऊ शकतो.

      https://www.askapollo.com/physical-appointment/cardiologist

      The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content

      Cardiology Image 1

      Related Articles

      More Articles

      Most Popular Articles

      More Articles
      © Copyright 2024. Apollo Hospitals Group. All Rights Reserved.
      Book ProHealth Book Appointment
      Request A Call Back X