Verified By Apollo Cardiologist July 28, 2023
5433विहंगावलोकन
कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी (CABG) किंवा बायपास शस्त्रक्रिया, जिला अनेकदा “कॅबेज” असे म्हणले जाते ती एक सर्वात सामान्य शस्त्रक्रिया आहे.१९६० च्या दशकात प्रारंभ झाल्यापासूनच CABG मध्ये अनेक तांत्रिक आणि चिकित्सिय विकास झाला आहे.
ह्रदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (रोहिण्यांमध्ये) जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा CABG ही शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये ह्रदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्ग तयार केला जातो.या प्रक्रियेमध्ये, अरुंद झालेल्या किंवा अवरोधित झालेल्या रोहिणीला वळसा घालून जाण्यासाठी एक रक्त वाहिनी (पायाची, हाताची किंवा छातीच्या भिंतीची रक्तवाहिनी) काढली जाते आणि ह्रदयाच्या स्नायूला होणारा रक्तप्रवाह पूर्ववत केला जातो.या वाहिनीला रोपण म्हणतात.
या पर्यायी रक्तवाहिन्या छाती, पाय किंवा बाहूंमधून काढल्या जातात.या उतींपासून रक्ताची ने आण करण्यासाठी इतर मार्ग उपलब्ध असल्यामुळे या वाहिन्या वापरणे सुरक्षित असते.छातीतील अंतर्गत स्तनाची रोहिणी उत्तम दीर्घकालीन परिणाम देत असल्याचे आढळले आहे. ९० टक्के रोपणे दहा वर्षांनंतरही चांगले कार्य करत असल्याचे आढळते.पायातील सफेनस शिरा किंवा रेडिअल रोहिणी (मनगटातील रोहिणी) सुद्धा वापरता येते.काहींमध्ये सर्व रोहिण्यांची रोपणे वापरली जातात तर काहींमध्ये रोहिण्या आणि शिरांची रोपणे वापरली जातात.ह्रदयाच्या किती रोहिण्या अवरोधित झाल्या आहेत त्यानुसार रुग्णाला एक किंवा जास्त बायपास रोपणे करून घ्यावी लागू शकतात.
ह्रदयाच्या पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेमध्ये, शल्यविशारद छातीच्या हाडाच्या मध्यभागी (सुमारे ६ ते ८ इंचाची) एक चीर देतो आणि ह्रदयापर्यंत थेट प्रवेश मिळवतो.रुग्णाला ह्रदय-फुफ्फुसाचे बायपास मशीन जोडलेले असते ज्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताभिसरण चालू राहते.ह्रदय थांबवले जाते व शल्यविशारद बायपास प्रक्रिया करतात.
ऑफ-पंप ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया काय असते?
ऑफ-पंप हार्ट बायपास शस्त्रक्रिया (किंवा बीटिंग हार्ट बायपास शस्त्रक्रिया) करताना, ह्रदयाची धडधड चालू असताना शल्यविशारद शस्त्रक्रिया करतात.यामध्ये ह्रदय-फुफ्फुस यंत्र वापरले जात नाही.ह्रदयाचा ठराविक भाग धरण्यासाठी आणि रोहिणीला वळसा घालण्यासाठी शल्यविशारद शस्त्रक्रियेचे प्रगत उपकरण वापरतात.या प्रक्रिये दरम्यान, बाकीच्या ह्रदयाची धडधड आणि शरीराचे रक्ताभिसरण चालू राहते.
मिनिमली इनव्हॅसिव (किमान आक्रमक) बायपास शस्त्रक्रिया काय असते?
MICS CABG किंवा MICAS हे एक असे तंत्र आहे ज्यामध्ये छातीच्या डाव्या बाजूला ४ सेमीची लहान चीर देऊन ह्रदयापर्यंत पोहोचले जाते.कोणतेही हाड न कापता, स्नायू विभागून हाडांच्या मधून छातीत प्रवेश केला जातो.या रोपणामध्ये वापरली जाणारी पायातील वाहिनी सुद्धा एंडोस्कोपने (दिवा आणि कॅमेरा टोकाला बसवलेली एक पातळ शल्यक्रियात्मक नळी) काढली जाते.याला एंडोस्कोपिक व्हेन हार्वेस्टिंग (EVH) म्हणतात.MICS CABG चे फायदे म्हणजे रुग्णालयातून लवकर घरी सोडले जाते, वेदना कमी होतात, श्वसनावर सकारात्मक परिणाम होतो, कमीत कमी रक्त वाहते आणि संक्रमणाची जोखीमही कमी असते.
ह्रदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय?
काही रुग्ण रोबोटिक सहाय्याचे तंत्र वापरून केलेल्या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा योग्य असतात, यामध्ये यापेक्षा बारीक चीर देऊन, बंद छातीमध्ये, ह्रदयाची धडधड चालू असलेल्या वातावरणात बायपास शस्त्रक्रिया केली जाते.
नवीन ‘हायब्रिड सूट’ विकसीत झाले आहेत ज्यामुळे एकाच वेळी किंवा अवस्थेतील CABG आणि स्टेंट बसविण्याच्या प्रक्रिया सध्या केल्या जात आहेत.गेल्या शंभरहून कमी वर्षांत ह्रदयाची शस्त्रक्रिया दुर्मिळ पासून ते नित्याची होण्यापर्यंत पोहोचली आहे.प्रमुख प्रगतींमुळे CABG अधिक सुरक्षित आणि जास्त स्वीकारली जाणारी प्रक्रिया बनली आहे.भिन्न दृष्टिकोन, पद्धतींबाबत निरंतर संशोधन आणि वैद्यकीय हस्तक्षेपांमुळे ह्रदयाच्या शस्त्रक्रिया भविष्यात आणखी कमी आक्रमक आणि कमी जोखमीच्या बनू शकतात.
The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content